भुवनेश्वर - भारताने जमिनीवरून जमिनीवर मध्यम अंतरापर्यंत मारा करणाऱ्या 'अग्नि - 2' या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यासही सक्षम आहे. याचे पहिले परीक्षण डॉ. अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आले. याची मारक क्षमता दोन हजार किलोमीटरपर्यंत आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ओडिशाच्या बालासोर येथील किनाऱ्यावरून याचे परीक्षण करण्यात आले.
2000 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे हे क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात आधीच दाखल झाले आहे. याचे प्रथमच रात्री परीक्षण करण्यात आले. डीआरडीओने हे क्षेपणास्त्र बनवले आहे. हे २० मीटर लांब असून याचे वजन १७ आहे. तर, हे १ हजार किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकते.
यापूर्वीच्या अग्नी - 1 ची मारक क्षमता ७०० किलोमीटर आहे. तर, अग्नी - ३ ची ३ हजार किलोमीटरवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. यानंतरची अग्नी - 4 आणि अग्नी - 5 ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.