मुंबई - श्रीलंका रविवारी ८ शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. हे बॉम्बस्फोट होण्याआधी भारताने श्रीलंकेला एकूण ३ अलर्ट पाठवले होते. बॉम्बस्फोट होण्याच्या काही वेळ आधी देखील भारताने श्रीलंकेला सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, त्यानुसार श्रीलंकेकडून योग्य पावले उचलली गेली नाहीत. या घडामोडींशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली. श्रीलंकेत झालेल्या या बॉम्ब स्फोटांमध्ये ३५९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. तर, ५०० जण जखमी झाले.
चार एप्रिल रोजी भारताने श्रीलंकेला पहिला अलर्ट दिला होता. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला टार्गेट केले जाऊ शकते असे भारताने पहिल्या अलर्टमध्ये म्हटले होते. तसेच, संशयित दहशतवादी आणि दहशतवादी संघटनेचे नाव सांगितले होते. हल्ल्याच्या एक दिवस आधी दुसरा अलर्ट पाठवला होता. यामध्ये पहिल्या अलर्टच्या तुलनेत ठोस माहिती होती. कुठल्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते ते नमूद केले होते. आत्मघातकी हल्लेखोरांनी ३ चर्च आणि ४ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या काही तास आधी तिसरा अलर्ट पाठवला होता.
तांत्रिक आणि मानवी सूत्रांच्या हवाल्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करुन हे अलर्टस देण्यात आले होते. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुद्धा भारताने बॉम्बस्फोटांआधी अलर्टस पाठवल्याचे मान्य केले. मात्र, श्रीलंकेकडून कारवाईत तत्परता दाखवण्यात आली नाही. इस्लामिक स्टेटने (आयएस) श्रीलंकेमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, याचा पुरावा दिलेला नाही. आयएसने हा हल्ला न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा सूड असल्याचे म्हटले आहे. क्राइस्टचर्च हल्ल्यात ५० हून अधिक लोक मारले गेले होते.
श्रीलंकेने आधी स्थानिक इस्लामिक संघटना नॅशनल तौहीद जमातवर संशय व्यक्त केला होता. बॉम्ब स्फोटांमध्ये इसिसच्या खूणा दिसतात असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते. श्रीलंकेमधील नागरी गृहयुद्ध संपल्यानंतर दशकभराने श्रीलंका आठ शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. परदेशी नागरिकांसह आठ भारतीयांचा या स्फोटांमध्ये मृत्यू झाला.