नवी दिल्ली - कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोना रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला आला. गेल्या काही दिवसांपासून दररोज 35 ते 40 हजार नव्या रुग्णांची भर पडत होती. मात्र, आज तब्बल 49 हजार 310 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 740 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण रुग्णसंख्या 12 लाख 87 हजार 945 वर पोहचली आहे. तर 4 लाख 40 हजार 135 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच यात दिलासादायक बाब म्हणजे, तब्बल 8 लाख 17 हजार 209 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 30 हजार 601 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वांत जास्त प्रभाव पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 47 हजार 502 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 12 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 लाख 40 हजार 395 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 1 लाख 94 हजार 253 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 27 हजार 364 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 745 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 52 हजार 477 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 252 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 92 हजार 964 कोरोनाबाधित तर 3 हजार 232 जणांचा बळी गेला आहे.
कोरोना चाचणी क्षमता वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने आतापर्यंत तब्बल 1 कोटी 51 लाख 28 हजार 170 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. तर गुरुवारी एकाच दिवसात 3 लाख 52 हजार 801 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणाऱया पहिल्या 5 राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.