नवी दिल्ली - चीनमधील वुहान प्रांतातून कोरोना विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली होती. त्यानंतर विषाणू झपाट्यानं जगभरात पसरला. भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 10 लाख 3 हजार 832 इतकी झाली आहे. देशात कोरोनाचा विळखा घट्ट होत, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतची उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 34 हजार 956 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 687 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाख 3 हजार 832 इतका झाला आहे. सध्या 3 लाख 42 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 6 लाख 35 हजार 757 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 25 हजार 602 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडूमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत आहे.
महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आतापर्यंत 11 हजार 194 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 84 हजार 281 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 14 हजार 947 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 58 हजार 140 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 18 हजार 645 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 3 हजार 545 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरात राज्यात 45 हजार 481 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 56 हजार 369 कोरोनाबाधित तर 2 हजार 236 जणांचा बळी गेला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 46, पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 23 तर कर्नाटकमध्ये 1 हजार 32 जणांचा बळी गेला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार हे एकमेव मार्ग आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणाऱ्या पहिल्या 5 राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 63.25 टक्के इतके झाले आहे.