नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 22 हजार 771 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 442 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही दिवसभरातील आजवरची उच्चांकी रूग्णसंख्या आहे.
भारतामध्ये कोरोना बाधितांच्या एकूण आकड्याने 6 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचं हे वाढत संकट चिंताजनक परिस्थिती निर्माण करत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 लाख 48 हजार 315 इतकी झाली आहे. यापैकी 2 लाख 35 हजार 433 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3 लाख 94 हजार 227 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात 18 हजार 655 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. जाणून घेऊया विविध राज्यांतील कोरोनाची स्थिती...
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 8 हजार 376 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 1 लाख 92 हजार 990 वर गेली आहे. यातील एकूण 79 हजार 927 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 4 हजार 687 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
नवी दिल्लीमध्ये 94 हजार 695 कोरोनाबाधित आहेत. तर 2 हजार 923 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुजरात राज्यात 34 हजार 600 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 904 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 2 हजार 721 कोरोनाबाधित तर 1 हजार 385 जणांचा बळी गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे दरामध्ये 60.80 टक्के पर्यंत सुधारणा झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आणि मृत्यूचे प्रमाण '95.48 : 4.52' टक्के आहे.
'मेड इन इंडिया'अंतर्गत आतापर्यंत 11 हजार 300 व्हेंटिलेटर पाठविण्यात आले आहेत. यातील 6 हजार 154 रुग्णालयात पोहोचले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून भारतभर सुमारे 1.2 लाख ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यात येत आहेत. त्यापैकी 72 हजार 293 वितरित करण्यात आले आहेत.