नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 851 कोरोनाबाधित आढळले असून 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 26 हजार 770 झाला आहे, यात 1 लाख 10 हजार 960 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 1 लाख 9 हजार 461 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 6 हजार 348 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.