भुवनेश्वर - नेपाळने नवा नकाशा प्रसिद्ध करत भारतातील काही भूभूगांवर दावा केल्याने दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. नव्या नकाशानुसार, नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारताच्या भूभागावर दावा केला आहे. मात्र, नेपाळचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. भारत रक्षा मंच या संस्थेने नेपाळकडून 1954मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या लिफाफ्यावरील स्टॅम्प सादर केला आहे. ज्यामध्ये नेपाळने वादग्रस्त क्षेत्र (लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा) हे भारताचे असलेले दाखवले आहे.
संबधित टपाल तिकीट नेपाळने 1954 मध्ये छापले होते. ज्यावरून असे दिसून आले की, ज्या भागावर नेपाळ दावा करत आहेत, तोच भाग नेपाळने 1954मध्ये भारताचा असल्याचे तिकिटावर दाखवले होते. याची प्रत नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि नेपाळी राष्ट्रीय संसदेच्या सदस्यांना पाठविली आहे.
भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव अनिल धीर म्हणाले की, 1954पासून नेपाळने 29 टपाल तिकिटे जारी केली आहेत. त्यामध्ये वादग्रस्त भाग (लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा) भारताचा म्हणून दर्शविली गेली आहेत. भारत रक्षा मंच ही एक अराजकीय संस्था असून तिची स्थापना 2010मध्ये करण्यात आली होती.