नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने एन-९५ प्रकारच्या मास्कवरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली आहे. यानंतर आता देशातून कोणत्याही प्रकारच्या मास्कची निर्यात करता येणे शक्य होणार आहे. विशेष व्यापार महासंचालक यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
यापूर्वी देशातील मागणी पाहता एन-९५ मास्कची निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये याची मर्यादित निर्यात सुरू करण्यात आली होती. महिन्याला केवळ ५० लाख एन-९५ मास्कची निर्यात करण्याची मर्यादा लागू करण्यात आली होती. मंगळवारी जारी केलेल्या नोटीसनुसार आता ही निर्यात मर्यादित स्तरावरुन खुल्या स्तरावर नेण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांमध्ये देशात मास्क आणि पीपीई किट्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक कंपन्या या गोष्टींचे उत्पादन घेत असल्याने, त्यांची निर्यात करता यावी अशी मागणी कितीतरी दिवसांपासून केली जात होती.
सरकारच्या या निर्णयाबाबत बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले, की भारत आता जगाला एन-९५ आणि एफएफपी-२ मास्क देऊ शकतो. या आणि इतर सर्व प्रकारच्या मास्कवरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे. हे 'मेक इन इंडिया'चे यश आहे. यामधून देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत आहे, असेही गोयल म्हणाले.
हेही वाचा : देशातील ७४ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार न्यूज चॅनेल बनलेत मनोरंजनाचे साधन