नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना विरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे टाकत भारताने एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख 180 कोरोना चाचण्या केल्या आहेत.
दरम्यान देशात आतापर्यंत तब्बल 38 लाख 37 हजार 207 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 180 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) दिली.
जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी फक्त एकच प्रयोगशाळा होती. मात्र, आज संपुर्ण भारतामध्ये एकूण 676 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 472 ह्या शासकीय तर 204 ह्या खासगी प्रयोगशाळा आहेत. तसेच जगाच्या तुलनेत भारताचे मृत्यूचे प्रमाण कमी असून रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 8 हजार 392 कोरोनाबाधित आढळले असून 230 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 90 हजार 535 झाला आहे, यात 93 हजार 322 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 91 हजार 819 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 5 हजार 394 जणांचा बळी गेला आहे.