नवी दिल्ली – देशाच्या भूभागावर अतिक्रमण करणाऱ्या चीनला भारताने गर्भित इशारा दिला आहे. चीनच्या घुसखोरीविरोधातील समस्येबाबत दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली तर भारताकडे सैन्यदलाचा पर्याय असल्याचे संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी विधान केले आहे.
लडाखमधील चीनच्या सैन्यदलाच्या घुसखोरीविरोधातील समस्येवर सैन्यदलाचा पर्याय आहे. मात्र, हा पर्याय दोन्ही देशाचे सैन्यदल आणि राजनैतिक पातळीवरील अयशस्वी चर्चा ठरल्या तर असल्याचे जनरल बिपीन रावत यांनी सांगितले. ते पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून भारत आणि चीनच्या वादावर बोलत हते.
पूर्व लडाखमध्ये भारत-चीनचे सैनिक हे एप्रिल-मेपासून आमने-सामने उभे ठाकले आहेत. यामध्ये फिंगर क्षेत्र, गलवान खोरे, हॉट स्प्रिंग्ज आणि कॉनग्रुंग नाला या भूभागाचा समावेश आहे. दोन्ही देशांमधील तणावाचे संबंध सुरळीत करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. यामध्ये लेफ्टनंट जनरल पातळीवरील पाचवेळा चर्चा करण्यात आली. मात्र, अद्याप वादावर ठोस तोडगा निघाला नाही.
सैन्यदलाकडे नेमके काय पर्याय आहेत? हे सांगण्यास संरक्षण दलाचे प्रमुख रावत यांनी नकार दिला. चीनच्या सैन्यदलाने फिंगर क्षेत्रातून मागे जाण्यास नकार दिला आहे. उलट सैन्य मागे घेण्यासाठी चीन वेळकाढूपणा करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. असे असले तरी दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व लडाखमधून देशाचे सैन्य हटविण्याचा चीनने सूचविलेला पर्याय भारताने फेटाळला आहे. गेली सहा दशके फिंगर क्षेत्रात भारतीय सैन्यदल असल्याचे भारताच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भारताने चीनची आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी गुंतवणुकीचे कठोर नियम करणे व टिकटॉकसह इतर 56 अॅपवर बंदी, असे पावले उचलले आहेत.