नवी दिल्ली - आतापर्यंत देशभरात 81 लाख 37 हजार 119 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 1 लाख 21 हजार 641 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच आतापर्यंत 74 लाख 32 हजार 829 कोरोनाग्रस्तांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या देशभरात 5 लाख 82 हजार 649 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 7.16 टक्के आहे.
शनिवारी देशात 48 हजार 268 नवे रुग्ण सापडले असून 551 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 1 लाख 21 हजार 641 वर गेल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली. देशातील मृत्यूदर घसरला असून तो 1.5 टक्क्यांवर आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
दिल्ली
आजपासून दिल्लीतील राज्यांतर्गत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू होत असून सर्व सिटांवर प्रवास्यांना बसता येणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी सांगितले. मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही, असे ते म्हणाले. प्रवास्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करतानाच मास्क लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील सर्व व्होलसेल दारू विक्रेत्यांकडील कामगारांना आरोग्यसेतू अॅप अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दुकानात व्यवहार करताना सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी कोरोनावर जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत मास्क हेच प्रभावी औषध असल्याचे सांगितले. सामूहिक संसर्गावर पूर्णत: नियंत्रण मिळवणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे मास्क हेच औषधरुपी वापरावे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये बनावट एन-95 मास्क बनवणाऱ्या कंपनीवर छापा टाकला आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून या प्रकारच्या मास्कची मागणी बाजारात वाढली आहे. त्यामुळे बनावट मास्क बनवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात यश आल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सांगितले. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. पुणे हे राजकारणाचं सत्ताकेंद्र आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते मुंबई होतं. मात्र आता महत्त्वाची माणसं पुण्यात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेशातील शाळा 2 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. यंदा कोरोनामुळे राज्य सरकारने २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलले आहे, 2 नोव्हेंबरपासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरू होत आहेत. त्यासाठी एकदिवसाआड विविध वर्ग भरणार आहेत. प्रत्येक खोलीत फक्त 16 विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध असणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.
राजस्थान
राजस्थान विधिमंडळाचे लॉकडाऊननंतर पहिले अधिवेशन भरत आहे. पहिल्याच दिवशी मास्क घालण्यासंबंधी नियमावली विधेयक नव्याने मंजूर करण्यात आले.