नवी दिल्ली - चीन आणि भारत यांच्यादरम्यान सुरू असलेल्या पूर्व लडाख प्रांतातील सीमा तणावासंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दोन्ही देश सध्या एका अभूतपूर्व परिस्थितीतून मार्गक्रमण करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. याला उभयतांत उद्भवलेल्या सीमावादाची पार्श्वभूमी आहे.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या व्हर्च्युअल व्यासपीठावर त्यांनी भारत-चीन संबंधांवर भाष्य केले. दोन्ही देश झपाट्याने विस्तारत असताना त्यांच्या सीमेवर तणाव निर्माण होणे आणि त्यातून एमेकांशी जुळवून घेणे हा महत्त्वपूर्ण विषय असल्याचे त्यांनी म्हटले.
10 सप्टेंबरला रशियाच्या मॉस्को शहरात पार पडलेल्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाच मुख्य विषयांवर करार केला. भारत-चीन सीमाप्रश्न ताणला जात असताना हा करार आणि यातील भारताला विश्वासात घेण्याचा मुद्दा महत्वाचा होता. त्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रांनी स्वाक्षरी केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री एस. जयशंकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आशियातील दोन्ही महासत्तांमधील पुढील संबंध कशाप्रकारे पार पडणार, यावर परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही देशांनी एकमेकांच्या वाढीस आणि विस्तारास समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्या दोन्ही देश एका अभूतपूर्व परिस्थितीतून मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी म्हटले. पण छोट्या काळासाही का होईना, ही महत्त्वाची घटना आहे. मात्र, दीर्घकाळाच्या वाटचालीसाठी दोन्ही देशांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल, असे मत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मांडले आहे. तसेच दोन्ही देशांतील मुत्सद्देगिरीसमोर उभयतांतील वाढ आणि विस्ताराचे मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.