मुंबई : झी मीडिया ग्रुपच्या मुंबईमधील कार्यालयांवर आज आयकर विभागाने छापे मारले आहेत. झी ग्रुपने प्राप्तीकर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याचे प्राप्तीकर विभागाने सांगितले. झी मीडिया ग्रुपने या कारवाईची पुष्टी केली आहे.
कंपनीचे पूर्ण सहकार्य..
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, की प्राप्तीकर विभागाचे काही अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यालयांना भेट दिली. त्यांना काही माहिती हवी आहे, त्यासंदर्भात ते तपास करत आहेत. आमचे अधिकारी त्यांना हवी असलेली सर्व माहिती देत आहेत, तसेच त्यांच्या कारवाईस पूर्णपणे सहकार्य करत आहेत.
मुंबईसह दिल्लीमधील कार्यालयांवरही छापे..
दरम्यान, ही कारवाई केवळ मुंबईमधील कार्यालयांवर होत आहे, की दिल्लीमधील कार्यालयांवरही होते आहे याबाबत या प्रवक्त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र, प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, झी ग्रुपच्या मुंबई आणि दिल्लीमधील कार्यालयांवरही छापेमारी सुरू आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास या अधिकाऱ्यानेही टाळाटाळ केली.
झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा हे राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या वर्षीपासूनच ही कंपनी तोट्यामध्ये आहे. देणेकरांची परतफेड करण्यासाठी सध्या ही कंपनी नॉन-कोर व्यवसायांकडे वळत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.
हेही वाचा : टॉवर्सच्या तोडफोडीविरोधात रिलायन्स न्यायालयात; म्हणाले कृषी कायद्यांशी आमचा संबंध नाही