शाहजहांपूर- उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. जिथे 5 जणांनी नशा करून एका महिलेला घरातून जबरदस्तीने उचलून नेले आणि अत्याचार केले. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधीक्षकांकडे मदतीसाठी याचना केली. मात्र तिचे कोणीही ऐकले नाही. कोर्टाकडून दीड महिन्यानंतर आदेश आल्यानंतर त्या 5 जणांवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या गावात राजकुमार यांच्याघरी नामकरणाचा कोर्यक्रम होता. यावेळी गावातील धरम सिंह, भगवान सिंह आणि अरनु हे दारू पिऊन होते. पीडितेचे म्हणणे आहे. की जेव्हा ती गावातून बाहेर आली तेव्हा या लोकांनी तिला पाहिले. आणि रात्री साडेअकराच्या सुमारास त्यानी भिंतीवरुन उडी मारुन घरात प्रवेश केला. आणि पीडित महिलेच्या तोंडात एक कपडा ठुसला. त्यानंतर धरमसिंहच्या घरी नेले. तिथे पीडितेचे हात पाय बांधले व सामूहिक अत्याचार केला. तसेच पीडितेला काही बोलल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
जेव्हा ती तिच्या घरी आली तेव्हा तिचा पती शेतातून परत आला होता. तिने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने आणि तिच्या पतीने 17 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करावी लागेल म्हणून सदर प्रकरण पुढे ढकलण्यात आले. पीडितेला जबाब बदलण्यास सुध्दा भाग पाडण्यात आले, अशी माहिती पीडितेने दिली आहे.
त्यानंतर पीडितेला 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान पोलीस अधीक्षकांसमोर हजर केले. परंतु त्यानंतरही तिची सुनावणी झाली नाही. पीडितेने शेवटी न्यायालयात आश्रय घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार राजकुमार, धरम सिंह, भगवान सिंह, अरनु आणि रामनिवास यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात 452, 376-डी, 506 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.