नवी दिल्ली - छत्तीसगढमधील गरियाबंद येथे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या भावाच्या इच्छेखातर बहिणीने लॉकडाऊनमध्ये लग्न केले आहे. कर्करोग पीडित भावाची मरण्यापूर्वी आपल्या बहिणीचे लग्न पाहण्याची इच्छा होती. अखेर जिल्ह्यातील देवभोग विकासखंडमधील मोखागुडा गावात साध्या पद्धतीने विवाह पार पडला.
बहिणीचे नाव सुशिला तर भावाचे नाव राजेश असून हे दोघेही मोखागुडा गावातील रहिवासी आहेत. राजेश कर्करोगाने पीडित आहे. सुशिलाचे लग्न 5 मेला ठरवण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राजेशने लग्न पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर 5 मेलाच लग्न लावण्याचे ठरवण्यात आले.
नवरदेव मुलाचे नाव संतोष असून तो चिंगराभाठा येथील रहिवासी आहे. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाबाबत चर्चा केली आणि लग्न घरातच करण्याचा निर्णय घेतला. अखेर सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.
देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लग्न संमारंभांना प्रशासनाकडून परवानगी नकारण्यात येत आहे. त्यामुळे, मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-यवती घरात लग्न करताना दिसून येत आहे.