नवी दिल्ली - दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त महिलेने बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे बाळ अगदी निरोगी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
एम्सच्या प्रसूती व स्त्री-रोगशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. नीरजा भाटला यांनी या प्रसूतीचे नेतृत्व केले. शुक्रवारी संध्याकाळी या बाळाने जन्म दिला. अपेक्षित तारखेच्या एक आठवड्यापूर्वीच या बाळाने जन्म झाल्याने सी-सेक्शनच्या माध्यमातून ही प्रसूती करावी लागली. सध्या आई आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे नीरजा यांनी सांगितले.
या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे का याबाबत आम्ही चाचणी करणार आहोत. सध्या या बाळाची प्रकृती उत्तम असून, आम्ही त्याला आणखी काही काळ निरीक्षणाखाली ठेवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
एम्सच्याच शरीरविज्ञान विभागात काम करत असणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यामार्फत त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले होते. त्यावेळी त्या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यानंतर काल त्यांनी बाळाला जन्म दिला. या डॉक्टरांच्या भावालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या बाळाला स्तनपानाची गरज असल्यामुळे, सध्या हे बाळ आपल्या आईसोबतच आहे. स्तनपानातून कोरोनाची लागण होऊ शकते का, याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्त महिला ठराविक खबरदारी बाळगत आपल्या बाळाला दूध पाजू शकते, अशी माहिती एका डॉक्टरांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले, की कोरोनाग्रस्त असूनही या बाळाच्या आईमध्ये सध्या कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीयेत.
हेही वाचा : कोरोनापासून बचाव करण्यासाठी दर 90 मिनिटाला स्वच्छ करा तुमचा मोबाईल