वरुण धवन -नताशा दलाल विवाह -
बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल सोबत विवाहाच्या पवित्र बंधनात अडकणार आहे. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा विवाह समारंभ कुटुंबीय आणि काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आज (रविवारी) विवाह समारंभ होणार आहे.
गोव्यातील इफ्फी महोत्सवाचा आज अंतिम दिवस -
51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे आयोजन पणजी येथे डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सावाचे आज समापण होणार आहे. महोत्सवात जगभरातील 224 चित्रपट या महोत्सवात सामील झाले आहेत.
शरद पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार हे रविवारी २४ जानेवारी रोजी अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथे येत आहेत. त्यांच्या हस्ते सकाळी १० वाजता अकोले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार यशवंतराव सखाराम भांगरे यांच्या 39 व्या पुण्यतिथी निमित्ताने पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यावेळी शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नासांठी शेतकरी मेळावा होणार आहे.
मनसेचे 'लाव रे तो बॅनर' आंदोलन -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (रविवार) नियोजित दौऱ्यात शरद पवारांना 'लाव रे तो बॅनर'या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. 'पवार साहेब गोरगरीब खासगी रुग्णालयाने कोरोनाकाळात लुटमार केलेल्या वाढीव बिलांची रक्कम मिळवून द्या', असे बॅनर लावले जाणार आहेत.
नागपुरात चिकन व अंडी महोत्सवाचे आयोजन -
महाराष्ट्र पशु विज्ञान, मत्स्यव्यवसाय विद्यापीठ (एमएएफएसयू) फुटाला रोड तेलंगखेडी नागपूर येथे क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत चिकन आणि अंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोहित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर -
राष्ट्रवादीचे नेते व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
मुंबईत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संपाचा इशारा -
मानधन वाढीच्या मागणीसोबतच आपल्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेने आज संपाचा इशारा दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री आज आसाममध्ये -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ( 24 जानेवारी 2021) आसाम दौऱ्यावर जाणार असून तेथे एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
'जेईई' साठी ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख -
जेईई मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपली होती. या मुदतीत वाढ करण्यात आली असून २३ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील तर आज २४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन शुल्क भरता येईल. तसेच २७ ते ३० जानेवारीला अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध असेल.
आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन -
आज आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 24 जानेवारीला आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केले. यानिमित्ताने युनोने शांतता आणि विकासासाठी शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली.