नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर काही काळापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्याबरोबच ईव्हीम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध असणार आहेत. मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
व्हीव्हीपॅट मशीनचा सार्वत्रिक वापर करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवडणूक आयोगाकडून इव्हीएमसोबत छेडछाड होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्व मशीन्सवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. विरोधीपक्षाकडून ईव्हीएमची छेडछाड केली जात असल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे ते सातत्याने मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करत आहेत. शिवाय एका हॅकरने ईव्हीएमसोबत भाजप छेडछाड करत असल्याचा आरोप केला होता. यामुळेच ईव्हीएमची विश्वासार्हता वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे निर्णय घेतले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार देशात ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होईल. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
काय आहे व्हीव्हीपॅट
व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिलं आहे. ते मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही याची शहानिशा करता येते.