हैदराबाद - भारतामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 23 तारखेला देशभर टाळेबंदीची घोषणा केली. आज 17 दिवस झाले, देशभरातील अत्यावश्यक सेवेसंबंधी उद्योग सोडता सर्व बाजारपेठा, हॉटेल, वाहतूक, मद्यगृहे, शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील खाद्य आणि पेय क्षेत्रातील तब्बल 20 टक्के कामगारांचा रोजगार जाण्याची भीती नॅशनल रेस्टॉरंट असोशिएसन ऑफ इंडिया (एनआरएआई) या संस्थने वर्तवला आहे.
देशभरात अप्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे खाद्य आणि पेय क्षेत्र 7 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देते. या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा 4 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. अशी माहिती एनआरएआई चे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी दिली.
अध्यक्ष अनुराग कटियार यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या -
- एक वर्षासाठी जीएसटी, इतर कर, पीएफ, ईएसआईसी, सीमा शुल्क, राज्य उत्पादक शुल्क, दारू परवाना नुतनीकरण, वॅट अशा प्रकारचे कर वसूल करू नयेत.
- जीएसटीवर इनपूट कर क्रेडीट लवकर भरला जावा.
- बेरोजगारी भत्ता दिला जावा
- एक वर्षासाठी सर्व प्रकारचे कर्ज परत फेडीवर स्थगिती आणावी तसेच वापरात असलेल्या रकमेवरील व्याज माफ करावे.
तसेच संचारबंदी संपल्यानंतर जेवणाचे डिलीव्हरी चार्जेस वाढले जाण्याची शक्यता आहे. परिणामी लोक घरीच जेवण बनवून खातील यामुळे खाद्य आणि पेय क्षेत्राला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व मागण्या मान्य कराव्यात.