नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले.आता अनलॉक वन सुरू झाले आहे. बंद असलेले व्यवहार, उद्योग सुरू होत आहेत. अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्यापासून नागरिकांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी सूक्ष्मजीव प्रतिरोधक मास्क बनवला आहे. या मास्कला त्यांनी 'अभय' हे नाव दिलेय. या मास्कमध्ये ट्रिपल लेअर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे जिवाणू, विषाणू याबरोबर घाम, धूळ, माती या पासून संरक्षण होणार आहे.
‘अभय’ मास्क आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी बनवला आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. एन-95 मास्क महाग असल्यामुळे ते सर्वजण विकत घेऊ शकत नाहीत आणि साधे मास्क वापरल्यामुळे जिवाणू विषाणूपासून संरक्षण होऊ शकत नाही, असे सूरज पुनिया या विद्यार्थ्यांने म्हटले. आम्ही सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करत अभय मास्कची निर्मिती केली आहे.
अभय मास्कचे वैशिष्ट्य
अभय मास्कमध्ये ट्रिपल लेयरचा वापर करण्यात आल्यामुळे जिवाणू आणि विषाणूपासून वाचता येते आणि बोलताना बाहेर पडणारे लाळेचे थेंब बाहेर पडणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर व्यवस्थित बसेल अशी, मास्कची रचना करण्यात आली आहे. पावसाळ्याही हा मास्क वापरता येईल,असे सूरज पुनिया याने सांगितले. या मास्कला 25 वेळा धुऊन वापरता येणार आहे
एन-95 मास्कची किंमत जास्त आहे. मात्र अभय मास्क 49 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फक्त उत्पादित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात मास्क उपलब्ध करुन देत आहोत, असे सूरज पुनिया याने सांगितले.