श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात भारतीय लष्करातर्फे जंगी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीत जिल्ह्यातील अनेक मुस्लीम बांधवांसह स्थानिक प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढताना लष्कराला अनेकवेळा स्थानिक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. काश्मीरींचा सैन्याप्रती वाढत जाणारा रोष चिंतेची बाब आहे. मात्र, स्थानिकांच्या मनातील लष्कराविरूद्धचा आकस कमी करण्यासाठी लष्कर सदैव प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून धगधगत्या पूँछ जिल्ह्यात लष्करातर्फे रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या इफ्तार पार्टीसाठी परिसरातील नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. मुस्लीम बांधवाना रोजा ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळी नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी मिळून सोबत जेवणाचा आस्वाद घेतला. जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातून या कार्यक्रमासाठी मुस्लीम बांधव आले होते. स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारीही यावेळी सहभागी झाले होते.
काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी कुख्यात दहशतवादी जाकीर मुसा याला कंठस्नान घातले होते. जाकीर मुसाच्या मृत्यूंनतर काश्मीर खोऱ्यात तणावग्रस्त परिस्थिती होती. मुसाच्या अंत्ययात्रेत हजारो स्थानिक सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा लष्करावरील रोष वाढला असल्याचे दिसून आले. मात्र, आता शांतता प्रस्थापीत करण्यासह काश्मीरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आयोजीत केलेल्या लष्कराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.