नवी दिल्ली - दिल्लीतील दंगलींबाबत आक्षेपार्ह वार्तांकन केल्याप्रकरणी केरळमधील मल्याळी भाषेतील दोन वृत्तवाहिन्यांवर घातलेली बंदी उठवण्यात आली आहे. दोन्ही वृत्तवाहिन्यांवर 48 तासांसाठी बंदी घालण्यात आली होती.
आम्ही दोन्ही वृत्तवाहिन्यावरील बंदी हटवली आहे. स्वतंत्र पत्रकारितेचे मोदी समर्थन करतात. याप्रकरणी मोदींनी चिंता व्यक्त केली. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचेही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
मीडिया वन आणि एशियानेट न्यूज टीव्ही अशी या दोन वाहिन्यांची नावे आहेत. एशियानेट न्यूज टीव्हीवर लावण्यात आलेली बंदी रात्री 1:30 वाजता आणि मीडिया वन वरील बंदी शनिवारी सकाळी उठवण्यात आली आहे. दोन्ही वृत्तवाहिन्यांना मंत्रालयाकडून पत्र पाठवण्यात आल्यानंतर बंदी हटवली गेल्याचे सुत्रांनी सांगितले.
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी आक्षेपार्ह वार्तांकन केल्यामुळे दोन्ही वाहिन्यांना मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी काहीही उत्तर न दिल्य़ामुळे मंत्रालयाने त्यांच्याविरोधात ही कारवाई केली होती. यामध्ये या वृत्तवाहिन्यांना 48 तासांसाठी कोणत्याही नव्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण, किंवा जुन्या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण करता येणार नव्हते. 6 मार्च सायंकाळी 7.30 ते 8 मार्च सायंकाळी 7.30 पर्यंत ही बंदी लागू राहणार होती.