हैदराबाद - रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे, या काळात अशा लोकांनी सतत आपला रक्तदाब तपासत राहावा, असा सल्ला डॉक्टरांनी रविवारी झालेल्या वर्ल्ड हायपरटेन्शन दिनी दिला. अतिसंवेदनशील आणि वृद्धांना कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होतो, असे सिकंदराबादमधील केआएमएस रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. शिवा राजू यांनी सांगितले.
अशा व्यक्तींना डॉक्टर शिवा यांनी या काळात घरीच राहाण्याचा सल्ला दिला. सोबतच रक्तदाबासाठी नियमितपणे औषधोपचार करणे, घरीच रक्तदाबाची पातळी तपासत राहाणे आणि दररोज 3 ग्रॅमपेक्षा कमी प्रमाणात मीठयुक्त आहार घेण्याच्या टीपही त्यांनी दिल्या. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दिवसात दोनपेक्षा अधिक वेळा कॉफी घेणे किंवा दारू आणि पेन किलरचे सेवन टाळावे.
आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींनुसार मृत कोरोनाबाधितांमधील सहा टक्के लोक हे रक्तदाब किंवा मधुमेहाचे रुग्ण होते. तर, केवळ दोन टक्के मृत रुग्णांना अशा कोणत्याही समस्या नव्हत्या. कॉन्टिनेन्टल हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. मीराजी राव म्हणाले, की सध्या लॉकडाऊनमुळे सुरू असलेले दैनंदिन जीवन अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
अनेकांच्या दैनंदिन आयुष्यातील हालचाली लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद झाल्या आहेत. अशात नागरिकांना कोरोनाशिवाय इतर आजारांच्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यानही आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवड्यात कमीत कमी 2 ते 3 तास व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.