हैदराबाद - येथील खैरताबादच्या प्रसिद्ध गणपतीचे भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात विसर्जन करण्यात आले. हुसैन सागर तलावात या ६१ फुटी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ही देशातील सर्वात उंच गणेशमूर्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी काही कलाकारांनी तेलंगणाचा सांस्कृतीक कार्यक्रम 'बोनाळू'चा देखावा केला होता, तर काही कलाकारांनी ट्रकवर उभारुन नृत्य देखील सादर केले. तेलंगणा पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या देखरेखीमध्ये या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
काल रात्रीच खैरताबाद गणेश उत्सव मंडळाने गणपतीचे दर्शन बंद केले आणि गणेश मूर्ती ट्रॉलीवर चढवण्याचे काम सुरु केले. यासाठी खास २६ चाकी, आणि ५५ टन वजन उचलू शकणारी ट्रॉली मागवण्यात आली होती. त्यानंतर, आज सकाळी साधारण साडे सहाच्या दरम्यान मूर्तीला ट्रॉलीवर चढवण्यात आले. शहरातून मिरवणूक काढत दुपारी साधारण २ च्या सुमारास गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
गणपती हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे, मुंबई असो किंवा हैदराबाद सगळीकडेच आज अगदी उत्साहात गणेश विसर्जनाची धामधूम सुरु आहे.
हेही पहा : हैदराबाद : बालापूर गणेश लाडवाचा तब्बल १७.६० लाखांना लिलाव