नवी दिल्ली - तबलिगी जमात प्रकरणाशी संबंध असल्यावरून दिल्लीमध्ये 197 परदेशी नागरिकांची पोलीस चौकशी सुरू आहे. या नागरिकांनी अद्याप त्यांचे पासपोर्ट दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे जमा केलेले नाहीत. हे सर्वजण आपले पासपोर्ट हरवल्याचे सांगत असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. मात्र, या लोकांनी पोलिसांकडे अद्याप पासपोर्ट हरवल्याच्या बाबीची नोंद केलेली नाही.
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिल्लीतील साकेत न्यायालयात 20 देशांच्या 82 नागरिकांवर 20 आरोपपत्रे दाखल केली आहेत. हे सर्वजण दिल्लीतील तबलिगी जमात प्रकरणाशी संबंधित असल्यावरून त्यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच, त्यांचे पासपोर्ट हरवल्याच्या प्रकरणाची चौकशीही होणार आहे.
'या परदेशी नागरिकांनी पर्यटन व्हिसाच्या आधारे भारतात प्रवेश केला होता आणि ते दिल्लीतील 'मरकज'मध्ये अवैधरीत्या सहभागी झाले. या लोकांनी व्हिसातील तरतुदींचा तर भंग केलेला आहेत. शिवाय, त्यांनी अत्यंत संसर्गजन्य असललेल्या आणि जगभरात महामारी बनलेल्या कोविड-19 च्या प्रसाराविषयी दाखवलेला निष्काळजीपणा गंभीर आहे. त्यांनी कोरोना विषाणूची स्वतःला लागण झालेली असतानाही सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन केले. ते पोलिसांनी परवानगी नाकारलेली असताना अवैधरीत्या आयोजित केलेल्या 'मरकज'मध्ये सहभागी झाले. यामुळे देशभरातील हजारो लोकांचे जीव धोक्यात सापडले. शिवाय, रुग्णालयात आणि इतर ठिकाणीही त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला. अशी अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण करण्यास हे सर्वजण कारणीभूत ठरले', असे आरोप या लोकांवर ठेवण्यात आले आहेत.
31 मार्चला 34 देशांमधील 900 हून अधिक नागरिकांवर दिल्लीतील बेकायदेशीर मरकज प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरणही आताच्या आरोपपत्राशी संलग्न आहे. सध्या आरोपपत्र ठेवलेले 82 लोक अफगाणिस्तान, ब्राझिल, चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, रशिया, अल्गेरिया, बेल्जियम, सौदी अरेबिया, जॉर्डन, फ्रान्स, मोरोक्को, कझाकस्तान, ट्युनिशिया, ब्रिटन, फिजी, सुदान, फिलिपाईन्स या देशांचे नागरिक आहेत.