हैदराबाद - कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर अनेक वाईट परिणाम झाले आहेत. नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर कोरोना प्रसाराचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगामुळे लोकांना भीती, काळजी आणि अस्वस्थ वाटणे साहजिक आहे. मात्र, या गोष्टींचे प्रमाण जास्त झाले की, साथीच्या रोगाची लागण होण्यापेक्षा मानसिक रोगी होण्याची शक्यता तयार होते.
प्रत्येकजण तणावाच्या परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असतो. आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचा यामध्ये मोठा वाटा असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मानसिक आरोग्य तज्ञांनी परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
मानसिकदृष्ट्या निरोगी कसे रहावे -
मानसिक आरोग्यासाठी जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या क्रिस अँड्रेहिल यांनी कोरोनाच्या काळात मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला आहे. क्रिस यांच्या मते, कुठल्याही अडचणीच्या काळात आपण आपला दिनक्रम शक्य तितका सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठून अंघोळ, नाश्ता, वृत्तपत्र वाचन या सारख्या नियमीत सवयी न बदलता त्या सुरू ठेवल्या पाहिजेत.
लॉकडाऊन काळात घरुन काम करत असाल तर, त्या कामासाठी ठराविक वेळ द्या. कामा दरम्यान छोटासा ब्रेक घेऊन घरातल्या घरात एक फेरफटका मारून थोड निवांत व्हा. यामुळे आपण घरात बसून काम करत असल्याचा विचार सारखा मनामध्ये राहणार नाही. या काळात बातम्या बघण्याचे शक्यतो टाळा कारण, यामुळे तणाव वाढण्याची शक्यता वाढते.
तणावात असलेल्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला कशी कराल मदत -
'क्रायसीस टेक्स्ट लाईन' संस्थेत शास्त्रज्ञ असलेल्या बॉब फिल्बीन यांच्या मते, आपत्ती किंवा संकटाच्या काळात बोलताना आपली शब्दांची निवड मोठी भूमीका निभावते. इतरांशी बोलताना, दिवस, आठवडा, महिने असे कालावधी दर्शक शब्द टाळावेत. यामुळे आपल्याला किती दिवस संकटाचा सामना करायचा आहे याची जाणीव वारंवार होत नाही.
जे तणावात आहेत किंवा परिस्थितीला घाबरले आहेत अशांना धीर दिला पाहिजे. या संकटामध्ये ते एकटेच अडकेले नसून शेकडो-लाखो लोक आहेत, याची जाणीव त्यांना करुन द्यावी.
लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना कसा द्याल मानसिक आधार -
संकटाच्या काळात विविध संस्थांच्या कामकाजावर परिणाम होतो. अनेकदा कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करावे लागते किंवा जीवाचा धोका पत्करून कार्यालयांमध्ये यावे लागते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आपल्याला काळजी असल्याची जाणीव त्यांना करुन द्या. त्यांना काही आरोग्य विषयक सल्ले आणि सुविधा उपलब्ध करुन द्या. कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱयांना प्रवासाची सुरक्षित आणि उत्तम सुविधा द्या. यामुळे कर्मचाऱ्यांचा संस्थेवर विश्वास वाढण्यास मदत होते.
मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी काय कराल -
संकटाच्या काळात मुलांना मानसिक आधाराची सर्वात जास्त गरज असते. त्यांच्या शंकाचे सोप्या आणि सौम्य शब्दांत निरसण करावे. जेणेकरुन त्यांना भीती न वाटता परिस्थितीचे गांभीर्य समजेल.
मुले तुमच्या सोबत सुरक्षित आहेत याची त्यांना जाणीव करुन द्या. जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करा. मुलांना सोशल मीडिया, न्यूज चॅनेल्सपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करा.