बंगळुरु - देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या काळात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात आहे. कर्नाटकातील एका खासगी रुग्णालयात अजब प्रकार समोर आला आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या एका रुग्णांचे तब्बल 9 लाख 25 हजार 601 ऐवढे बील आले आहे. तर एवढ्या बिलावर रुग्णालयाकडून फक्त 1 रुपया डिस्काऊंट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, संबधित रुग्णही वाचला नसून मृताच्या कुंटुंबीयांना हे बिल पाहून धक्का बसला आहे.
कदूर तालुक्यातील सखारायपाटममधील पिल्लेनाहल्ली येथील 70 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा उपचारासाठी त्यांना शहरातील आश्रय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाने दिलेले बिल पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
संबधित रुग्णालय काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षाचे आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटेकऱ्यांनी रुग्णालयावर टीका केली आहे. तसेच मृताच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयाविरोधात जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.