नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव वाढत असून भारतामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाना 4 लाखांची मदत गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनाची लागण झाल्याने कर्नाटकात एका वृद्ध रुग्णाचा तर शुक्रवारी दिल्लीत एका ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कोमॉर्बिडिटी (मधुमेह आणि अतितणाव) यासोबतच कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. संबधित महिलेचा मुलगा नुकताच अमेरिका, जपान आणि इटलीला जाऊन आला होता.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा येथील एक व्यक्ती नुकतीच हज यात्रा करुन परतली होती. त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या संशयित रुग्णाचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी असून त्या अहवालानंतर त्याला कोरोनाची लागण झाली होती का नाही? याची माहिती मिळणार आहे.
कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या भारतामध्ये 84 पेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशा वेळी हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होताना पाहायला मिळत आहे.