शिमला - हिमाचलच्या चंबा जिल्ह्यामध्ये झालेल्या एका अपघातात, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. राज्य परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये साधारणपणे ४० प्रवासी होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस १०० मीटर खोल दरीत कोसळली. यात चार प्रवासी जागीच ठार झाले, तर बाकी सर्व गंभीर जखमी झाले. लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक मदतीला धावले. तसेच पोलिसांनीही तातडीने बचावकार्यास सुरुवात केली. जखमींना पंडित जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आणखी दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना टांडा वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. राज्य सरकारने जखमींना प्रत्येकी पाच हजार, तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा हजारांची तात्पुरत्या स्वरुपातील मदत दिली आहे.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचाराप्रकरणी ताहिर हुसेनच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांचीही चौकशी