नवी दिल्ली - या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या हंदवारामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हिजबुल संघटनेचा प्रमुख सैद सलाहुद्दीन याने याबाबत बोलल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाकव्याप्त काश्मीरमधील असल्याचे म्हटले जात आहे.
या व्हिडिओमध्ये सैद हा रियाझ नायकू या दहशतवाद्याच्या शोकसभेला बोलताना दिसून येत आहे. यामध्ये तो नायकूच्या जाण्याने संघटनेचे नुकसान झाल्याचे बोलत आहे. तसेच याच व्हिडिओमध्ये त्याने काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रियाझ नायकू हा काश्मीरमधील हिजबुलचा कमांडर होता. हंदवारामधील हल्ल्यात त्याचा खात्मा करण्यात आला होता. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांमधील एक कर्मचारी हुतात्मा झाले होते.
सैदच्या या कबूलीनंतर पाक पंतप्रधान इम्रान खान यांची चांगलीच गोची झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील चकमक हे भारतीय लष्करांकडून केले जात असणारे खोटे फ्लॅग ऑपरेशन असल्याचा आरोप खान यांनी केला होता. मात्र आता सैदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्यांच्या या आरोपांचे खंडन झाले आहे.
हेही वाचा : धक्कादायक : कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा विनापास मुंबई ते भुजपर्यंत प्रवास, गुन्हा दाखल