मथुरा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंग आणि हिंदू धर्माला जोडल्याबाबत टीका केली आहे. आज देशात भीड-दंगे-हिंसेच्या नावावर हिंदू धर्म व संस्कृतीला बदनाम केले जात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. वृंदावन येथील वात्सल्य ग्राम येथे संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीच्या दोन दिवसीय बैठकीत ते बोलत होते.
'देशभरात हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्यासाठी कट कारस्थान रचले जात आहे'. भीड-दंगे तर कुठे हिंसाचाराच्या नावावर राजकारण करून समाजात हिंदू धर्माविषयी विष पसरविले जात आहे. काही राज्यात एका योजने अंतर्गत धर्मांतरणही केले जात आहे. देशाच्या या परिस्थितीकडे बघता, सर्व प्रचारकांनी सावध राहावे, सध्या सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले.
हिंदू धर्माच्या रक्षणाकरिता विविध मत-पंथ आणि उपासना पद्धतीच्या लोकांनी एकत्र येत विविध जाती-धर्माच्या लोकांमधील भेदभावाला संपविण्यासाठीचे प्रयत्न करावे. हा भेदभाव, हिंसाचार संपला तर समाजिक स्तरावरील कितीतरी प्रश्न मार्गी लागतील असे भागवत म्हणाले. या बैठकीत भारतीय सामाजिक सद्भाव समितीशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.
यात उत्तराखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू कश्मीर, कर्नाटक, केरल, छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, दिल्ली, त्रिपुरा और मेघालय सहित सर्व राज्यातील प्रतिनिधी तसेच संघाशी जुळलेल्या इतर कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला. संघातील सर्व कार्यकर्त्यांनी आपआपल्या राज्याचे अहवाल सादर केले. संघाचे सह-सरकार्यवाह कृष्ण गोपाल, दत्तात्रेय होसबळे आणि भैय्याजी जोशी यांनी यावेळी आपले विचार मांडले.