शिमला - हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील लाहौल-स्पीती जिल्ह्यात चिनी हेलिकॉप्टर दिसून आले. चीनने सीमेवर घुसखोरी केल्यापासून सीमा भागात अलर्ट वाढविण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीतीमार्गे या चिनी हेलिकॉप्टरनी भारतीय सीमेच्या आत १२ किमीपर्यंत घुसखोरी केली होती.
चीनच्या घुसखोरीनंतर भारतीय सैन्य, भारतीय तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी), हिमाचल पोलिसांनी लाहौल आणि किन्नौर या दोन्ही जिल्ह्यांत हाय अलर्ट जाहीर केला आहे. राज्य आणि केंद्राच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनीही जागरुकता वाढविली आहे. या एजन्सींनी लोकांना सतर्क राहण्यासही सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सुरक्षा दलांच्या तैनातीमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारतीय हद्दीत शिरलेल्या हेलिकॉप्टरमागे हेतुपुरस्सर काही गैरकारभार झाला आहे का, याचा शोध घेतला जात आहेत.यापूर्वीही चीनने अशाप्रकारे घुसखोरी केली होती. गेल्या आठवड्यात सिक्कीमध्ये भारत आणि चिनी जवानांमध्ये टक्कर झाल्याची बातमी आली होती. यामध्ये दोन्ही देशातील जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, नंतर हे प्रकरण मिटले होते. आता पुन्हा चीनने हिमाचल प्रदेशच्या सीमेवरील भागात हेलिकॉप्टर पाठवून घुसखोरी करत पुन्हा एकदा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.