नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 23 लाखाचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 66 हजार 999 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 942 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 लाख 96 हजार 638 झाला आहे, यात 6 लाख 53 हजार 622 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 16 लाख 95 हजार 982 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 47 हजार 33 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 1 लाख 47 हजार 820 सक्रिय रूग्ण असून, 18 हजार 650 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत 119 नव्या मृतांची नोंद झाली असून, एकूण आकडा 5 हजार 278 वर पोहचला आहे. दिल्लीमध्ये 4 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकामध्ये आतापर्यंत 3 हजार 510 जणांचा बळी गेला आहे. या पाठोपाठ गुजरातमध्ये 2 हजार 713 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान देशभरामध्ये आतापर्यंत 2 कोटी 68 लाख 45 हजार 688 कोरोना चाचण्या केल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 8 लाख 30 हजार 391 कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत माहिती दिली.