नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 1 लाखाचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 6 हजार 654 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 24 तासांत बाधित रुग्ण आढळलेला हा सर्वांत मोठा आकडा आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 25 हजार 101 झाला आहे, यात 69 हजार 597 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 51 हजार 783 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 3 हजार 720 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 44 हजार 582 कोरोनाबाधित असून 1 हजार 517 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 14 हजार 753 कोरोनाबाधित तर 98 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 13 हजार 228 कोरोनाबाधित असून 802 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 12 हजार 319 कोरोनाबाधित तर 208 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशभरामध्ये आतापर्यंत 28 लाख 34 हजार 798 कोरोना चाचण्या केल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 15 हजार 364 कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत माहिती दिली.