पटना - बिहारची राजधानी असलेल्या या शहरामध्येही प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (सोमवार) प्रदूषणासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये त्यांनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच नवीन नियमांचे मंगळवारपासूनच पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पटनाच्या हवेमध्ये पीएम २.५ या प्रदूषकाचा स्तर हा ४२८ मायक्रो प्रतिघन मीटर नोंदवला गेला आहे. सामान्यतः हा स्तर ९०च्या आत असायला हवा. साहजिकच पटनाची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे, हे लक्षात घेऊनच काही ठोस निर्णय आज घेण्यात आले आहेत.
या निर्णयांमध्ये एक म्हणजे, १५ वर्षांहून जुन्या गाड्यांना पटनाच्या रस्त्यांवर धावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रस्त्यांवर पाणी मारण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. कचऱ्याच्या गाड्यांनी कचरा नेताना तो झाकून न्यावा, तसेच कचरा जाळू नये. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कमीत कमी धूळ पसरावी यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला उप-मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, मुख्य सचिव दीपक कुमार यांच्यासह इतर उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते.
हेही वाचा : दिल्लीनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही लागू होणार 'ऑड-इव्हन'..