लखनऊ - मथुरामध्ये एका व्यक्तीने भर रस्त्यात आपली चारचाकी पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली. त्या व्यक्तीच्या हातात बंदूकही होती. गाडीला पेटवण्यासोबतच त्याने हवेत गोळीबार देखील केला. त्यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक, शालभ माथुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या माणसाचे नाव शुभम चौधरी आहे. हा मथुराचाच रहिवासी आहे. याच्यासोबत एक महिला आणि तीन लहान मुले होती. महिलेकडे देखील एक बेपरवाना शस्त्र होते. त्या व्यक्तीने बघता बघता आपल्या गाडीला भर रस्त्यात पेटवून दिले. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आपल्याजवळच्या बंदुकीने त्याने हवेत गोळीबार केला.
या माणसाकडे एक माईकदेखील होता, ज्याद्वारे तो लोकांना उद्देशून बोलत होता. तो भ्रष्टाचाराविषयी बोलत होता. हा सर्व प्रकार सुरु होता, तेव्हा त्याच्यासोबत असलेली महिला आणि मुले रस्त्याच्या मधोमध बसून होती. त्या दोघांना ताब्यात घेण्यास पोलिसांना बराच वेळ लागला. त्यानंतर त्यांना अटक करुन त्यांच्याकडे असलेली हत्यारे जप्त करण्यात आली.
हा सर्व प्रकार करण्यामागचे नेमके कारण काय होते याबद्दल पोलीस तपास सुरु आहे. तसेच या व्यक्तीचे आणि त्या महिलेचे नेमके नाते काय आहे, याबाबतही पोलिसांमध्ये संभ्रम आहे. कारण, तो व्यक्ती कधी ती महिला आपली पत्नी असल्याचे, कधी आपली बहीण असल्याचे, तर कधी आपल्यासोबत काम करणारी महिला असल्याचे सांगत आहे.
यासोबतच, त्यांच्यासोबत असलेली मुले कोण आहेत, त्यांना बेकायदा शस्त्रे कुठून मिळाली याबाबतही तपास सुरु असल्याचे माथुर यांनी सांगितले.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार होते. मात्र, या महिलेशी असलेल्या संबंधांमुळे त्याचे लग्न मोडले. त्यानंतर त्याला नैराश्याने ग्रासल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते.
हेही वाचा : 'भारत एक हिंदू राष्ट्र.. म्हणताच जमावाकडून एकास मारहाण