देहरादून – अतिवृष्टीमुळे उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढणे आणि भूस्सखलनाच्या घटना रोज घडत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्याच्या काही भागात दोन दिवसात अतिवृष्ट होईल, असा इशारा दिला आहे. तर येत्या दोन दिवसात वीज कोसळण्यासह ढगफुटी होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
छमोलीमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने डोंगराच्या दरड कोसळून बद्रीनाथ महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे स्थानिकांना इच्छिस्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत. अलकनंदा, पिंदर, नंदाकिनी नदी या धोक्याच्या पातळीहून काही कमी सेंटीमीटरवरून वाहत आहेत.
छमोली जिल्ह्याचे दंडाधिकारी स्वाती एस. भादोरिया म्हणाल्या, की पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. डोंगराची दरड कोसळून बंद झालेल्या रस्त्यावर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वीजेचे उन्मळून पडलेले खांब पुन्हा व्यवस्थित बसविण्यात येत आहेत. तालुक्याच्या विविध ठिकाणी आपत्कालीन मदतकार्याकरता एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत.
धारचुलामधील काही रस्ते हे भूस्स्खलन झाल्याने 8 तास बंद झाले होते. देहरादूनमधील आज दमट आणि हिवाळ्याप्रमाणे धुके आहे. पिथोरगड, बागेश्वर, छामोली, नैनिताल, उधमसिंग नगर, पौरी, तेहरी, देहरादून, हरिद्वार जिल्ह्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होईल, असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.