नवी दिल्ली/ दिसपूर- आसाममध्ये पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पुरामुळे आणखी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुरात जीव गमावलेल्यांची संख्या ६० वर पोहोचली आहे. राज्यातील ३३ पैकी २४ जिल्ह्यातील ४४,०८,१४२ लोक अजूनही पुराच्या विळख्यात सापडले आहेत.
आसाम सरकार पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करीत आहे. पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल मी केंद्र सरकार आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रीया आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. शनिवारी पुरात दगावलेल्यांमध्ये दक्षिण सलमारातील पाच, बरपेटातील तीन आणि नालबाड़ी, धुबरी, मरिगाव या जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. पुरात आत्तापर्यंत १.७९ लाख हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. पूरग्रस्त भागात लष्कराचे जवान ११ जून पासून बचावकार्य करत आहेत.