नवी दिल्ली : गुरुवारी दिल्लीत या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तर, शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले दिसून आले.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सकाळी साडेआठपर्यंत आयानगर हवामान स्थानकावर सर्वाधिक ९९.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर, पालम आणि रिज हवामान स्थानकांवार अनुक्रमे ९३.६ आणि ८४.६ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, सफदरजंग वेधशाळेने शहरात ६८ मिमी पावसाची नोंद केली.
पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहतूकीला अडथळा निर्माण होत होता. तर सुभाष चौक, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, राजा गार्डन आणि मायापुरी फ्लायओव्हर तसेच द्वारकाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले आढळून आले. दिल्ली उच्च न्यायालयाजवळ झाड कोसळल्याने देखील काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
दरवर्षीच्या ऑगस्टमध्ये साधारणपणे जेवढा पाऊस पडतो, त्यापेक्षा तब्बल ७२ टक्के कमी पावसाची नोंद यावर्षी बुधवारपर्यंत झाली होती. गेल्या १० वर्षातील ही सर्वात नीचांकी आकडेवारी आहे. मात्र आज झालेल्या पावसाने दिल्लीकरांच्या आशा अजूनही पल्लवीत ठेवल्या आहेत. तरीही, एकूण पाहता यावर्षी राजधानीमध्ये इतर वर्षांच्या तुलनेत ३५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
दिल्लीमध्ये बुधवारी रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे, तसेच गुरुवारीही दिवसभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या क्षेत्रीय वेधशाळेचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले. यासोबतच, पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.