नवी दिल्ली - गोकलपुरी भागामध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. सरकारकडून रतनलाल यांना हुतात्मा दर्जा देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत आणि पत्नीला योग्यतेनुसार नोकरी देण्यात येणार असल्याचे सीकर खासदार सुमेधानंद यांनी जाहीर केले आहे.
सोमवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान हवालदार रतनलाल यांना गंभीर इजा झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र काही वेळेनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर रतनलाल यांना शहीद दर्जा दिल्याशिवाय त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता.