नवी दिल्ली – जवानांसाठी समाज माध्यमांचा वापर बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून समाज माध्यम वापर करण्याची परवानगी मागितली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश राजीव सहाई एँडलॉ आणि आशा मेनन यांनी सैन्यदलाच्या अधिकाऱ्याची याचिका फेटाळली. क्षमस्व, आम्ही याचिका फेटाळत आहोत. धन्यवाद, असे खंडपीठाने याचिका रद्द करताना म्हटले आहे.
फेसबुक अकाऊंट हे निष्क्रिय स्वरुपात ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी सैन्यदलातील अधिकाऱ्याने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी न्यायालयाने तात्पुरता दिलासा द्यावा, असे सैन्यदलाच्या अधिकाऱ्याने याचिकेत म्हटले होते.
सैन्यदलाच्या 6 जूनच्या आदेशानुसार सर्व जवानांना फेसबुक, इन्स्टासह 82 अॅप बंद करावे लागणार आहेत. सैन्यदलाच्या गुप्तचर महासंचालनालयाच्या निर्देशानुसार सैन्यदलाने जवानांना काही अॅप आणि समाज माध्यम अकाऊंट बंद करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेने समाज माध्यमांचा वापर करत जवानांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात पकडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.