हैदराबाद- जगातील आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लढत आहेत. आरोग्य कर्मचारी या लढाईत जीवाची बाजी लावत आहेत. केरळमधील परिचारिका देश-विदेशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगामध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारिकांमध्ये सर्वाधिक परिचारिका भारतातील आहेत. यामध्ये केरळच्या परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे.
केरळमधून पदवी घेतलेले आरोग्य कर्मचाऱ्यापैकी अमेरिकेत 30 टक्के , ब्रिटनमध्ये 15, ऑस्ट्रेलियात 15 तर मध्य पूर्वेत 12 टक्के परिचारिका कार्यरत आहेत. ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या केरळच्या परिचारिकांच्या कामाचे कौतुक ब्रिटनचे माजी खासदार अन्ना सॉबरी यांनी केले आहे. अन्ना सॉबरी यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
आमच्या देशात काम करणाऱ्या विदेशी परिचारिकांच्याबद्दल आम्हाला कोणतिही समस्या नाही. भारतामधील विशेषता केरळमधील परिचारिका मानवता आणि सेवेच्या भावनेने काम करतात. त्यांच्याकडून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात,असे अन्ना सॉबरी यांनी त्यांच्या व्हिडीओत म्हटले आहे.
कोरोना विषाणूचा संपूर्ण जगात प्रसार झाला आहे. लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झालाय अशा परिस्थितीत केरळच्या परिचारिका कोरोना विरुध्द सुरु असलेल्या लढाईत जीवाची बाजी लाऊन लोकांची सेवा करत आहेत. त्यांचे कार्य प्रशंसनीय आणि अभिनंदनीय आहे. ईटीव्ही भारतचा केरळच्या परिचारिकांच्या कार्याला सलाम..!