लखनऊ - हाथरस बलात्कार प्रकरणात तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला आपला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावर ही एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीला आपला अहवाल सादर करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. याची माहिती उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी दिली.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या घटनेचे देशभरात अजूनही संतप्त पडसाद उमटत आहेत. पीडितेला न्याय देण्याची मागणी देशभरातून जोर धरत असून, पीडितेच्या कुटुंबीयांची विविध पक्षांसह संघटनांच्या प्रतिनिधींकडून भेट घेतली जात आहे. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रचंड विरोधानंतरही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
संपूर्ण देशाचे लक्ष हाथरसमधील घडामोडींकडे लागले आहे. या घटनेमुळे योगी आदित्यनाथ सरकारला विरोधकांनी घेरले आहे. तसेच सोशल मीडियातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश सरकारने सखोल तपासाठी एक एसआयटी स्थापन केली. या समितीकडून तपास करण्यात येत आहे. या समितीमध्ये तीन सदस्य असून याचे अध्यक्षस्थान गृह सचिव भगवान स्वरूप यांच्याकडे आहे.
एसआयटीला सुरूवातीला आपला अहवाल सात दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण अद्याप तपास पूर्ण न झाल्याने त्यांना अहवाल सादर करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, एसआयटीचा अहवाल सादर झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.