लखनऊ - हाथरस येथील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यासह ४०० लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाथरसमध्ये पोलिसांनी १४४ आणि १८८ कलम लागू केले आहे, त्याचे उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.
सुरुवातीला चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी हाथरसला जाण्यापासून रोखले होते. मात्र, नंतर त्याना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. काल चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत हाथरस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी काल केली. कारण सीबीआय चौकशी ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. पीडितेला न्याय मिळण्यात उशीर होऊ नये, असे आझाद म्हणाले.
त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवण्याचीही मागणी केली. मुलीचे कुटुंबीय सध्या दहशतीखाली आहेत. संपूर्ण गावात तणावाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, त्यामुळे त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे, असे आझाद म्हणाले. प्रशासनाने त्यांना सुरक्षा दिली नाही तर, त्यांना माझ्या घरी नेण्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही, असे आझाद यांनी सांगितले.
हाथरसमध्ये १४ सप्टेंबरला एका १९वर्षीय दलित मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केला होता. तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच तिचे अंत्यसंस्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.