चंडीगड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे शाळा-महाविद्यालये बंद असून लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून हरियाणा सरकारने टीव्ही प्रक्षेपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याचे ठरवले आहे.
यासाठी हरियाणात चार केबल चॅनेल उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यातील केबल ऑपरेटर्सला यासंबधित शिक्षण विभागाने तशा सुचना दिल्या आहेत. यामुळे राज्यातील ५२ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
या उपक्रमात चार चॅनेल्सवर विषयानुसार शिकवण्या घेण्यात येणार आहेत. यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम सामावून घेण्यात आला आहे. डीडी, डीश टीव्ही, व्हिडीओकॉन, एअरटेल आणि टाटास्काय या डीटीएच कंपन्यांच्या माध्यमातून शैक्षणिक वाहिन्यांचे प्रक्षेपण होणार आहे.
यासाठी दर्शकांना कुठलेही जास्त शुल्क द्यावे लागणार नाही. नियमित शुल्कात शैक्षणिक वाहिन्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. दिवसाचे आठ तास सर्वोत्तम शिक्षक राज्यातील विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. जेईई आणि नीट परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही वेगळी सोय करण्यात आली आहे, अशी माहिती हरियाणाचे शिक्षण मंत्री कंवर पाल गुर्जर यांनी दिली.