हिसार - हरियाणा राज्यात गाढवाचे दूध देणारी डेअरी लवकरच सुरू होणार आहे. हा देशातील पहिलाच अधिकृत उपक्रम असून एका लिटर दुधासाठी सात हजार रुपये रक्कम मोजावी लागणार आहे.
आतापर्यंत देशातील दुग्ध व्यवसायात गाय, म्हैस, बकरी आणि सांडणीच्या दुधाची मागणी होती. मात्र. यापुढे गाढवाचे दूध देखील उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो.
या डेअरीची सुरुवात नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वाइन्स संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. ही संस्था हिसार जिल्ह्यात घोड्यांवर संशोधन करते. डेअरीत हलारी ब्रीडच्या गाढवांचे संगोपन होणार असून त्यासाठी गुजरातमधून दहा मादी गाढवांना आणून त्यांच्यावर प्रक्रिया सुरू आहे. गाढवांवरील दुधासंबंधी संशोधन प्रक्रिया एनआरसीईचे माजी संचालक बी.एन.त्रिपाठी यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती.
हलारी गाढवांच्या दुधामुळे कर्करोग, स्थूलपणा आणि विविध अॅलर्जीचा सामना करता येतो. दुधातील रोगप्रतिकारक शक्ती लहान मुलांना उपयुक्त ठरते. ब्रिडिंग प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या दुधाची किरकोळ बाजारात सात हजार रुपये किंम असणार आहे. डेअरीतील अन्य प्रक्रिया एनआरसीईचे वैज्ञानिक तसेच कर्नालच्या सेंट्रल बफेलो रिसर्च सेंटर आणि नॅशनल डेअरी रसर्च इन्स्टिट्युट मार्फत होणार आहे.
एनआरसीईचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुराधा भारद्वाज यांनी गाढवाच्या दुधाचे महत्त्व पटवून देताना त्याचा लहान मुलांच्या वाढीवर होणाऱ्या फायद्याची माहिती दिली. डॉ. भारद्वाज या संबंधित प्रकल्पावर कार्यरत आहेत. दुधातील अन्य महत्त्वाच्या घटकांमुळे गंभीर आजारांवर मात करण्यास फायदा होतो, असे त्या म्हणाल्या. गाढवाच्या दुधापासून विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने तयार होतात. मात्र ते बाजारात महाग आहेत. केरळातील एका सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या कंपनीत डॉ. भारद्वाज कार्यरत होत्या.