सोनीपत - अखिल भारतीय किसान सभेचे नेते आणि पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातून आठ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले हन्नान मौला यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. तीन केंद्रीय कृषी कायदे दुरुस्त करण्याचा पर्याय सरकारने शेतकऱ्यांना दिला आहे. मात्र, कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत.
काय म्हणाले हन्नान मौला?
सरकार कृषी कायदे रद्द करेपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन संपणार नाही. मग त्यासाठी शेतकऱ्यांना कितीही दिवस आंदोलन सुरू ठेवण्याची वेळ येवो, असे मौला म्हणाले. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचीही माहिती दिली. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीच जुनीपुराणी चर्चा झाली. अमित शाह हे सुद्दा इतर नेत्यांप्रमाणे दुरुस्तीची गोष्ट करत आहेत. आम्ही अमित शाह यांना म्हणालो, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही तरी वेगळा मुद्दा मांडाल. मात्र, तुम्हीही इतर नेत्यांसारखे दुरुस्तीचाच विषय लावून धरला आहे.
अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारने तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे सुपूर्द केला आहे. या प्रस्तावावर ४० संघटना मिळून चर्चा करणार आहेत, आणि त्यानुसार आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. काल शेतकरी नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. तसेच आज होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.