शिमला - काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान असते तर कोरोना रुग्णांची संख्या वाढली असती आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली असती, असे वक्तव्य हिमाचल प्रदेशचे वनमंत्री राकेश पठाणिया यांनी केले आहे. पठाणिया यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवले असून आपण मोदींमुळेच कोरोना मृत्यू रोखू शकलो असल्याचेही ते म्हणाले. क्रांगा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पठाणिया यांनी हे वक्तव्य केले आहे.
'फ्रान्स, इटलीसारखे अनेक देश कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले. या देशातील कोरोना मृत्यूदर प्रचंड आहे. मात्र, भारतातील मृत्यूदर हा कमी असल्याचेही पठाणिया म्हणाले. हिमाचलल प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचाही दावाही त्यांनी केला. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे. हिमाचलचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा वाद काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्यामुळे राज्यात आम्ही सत्तेत येणार, असा दावा पठाणिया यांनी केला.