नवी दिल्ली - देशातील २१ विमानतळांवर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांची कोरोनासाठी तपासणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. सरकार हे कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी कार्यरत आहे. तसेच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज परिस्थितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच नेपाळ, भूतान आणि म्यानमारहून येणाऱ्या साधारणपणे दहा लाख नागरिकांचीही तपासणी करण्यात आल्याचे जावडेकरांनी सांगितले. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी अशा विषाणूबाबत तपासणी करण्यासाठी पुण्यातील एकमेव संस्था उपलब्ध होती. मात्र, सरकारने आता देशात अशा १५ प्रयोगशाळा उभारल्या असून, आणखी १९ केंद्रे सुरू करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताने काही देशांतील नागरिकांना व्हिसा देणे बंद केले असल्याचेही जावडेकरांनी स्पष्ट केले. भारतात सध्या कोरोनाचा संसर्ग झालेले २८ रूग्ण आढळले असून, यामध्ये इटलीच्या १६ पर्यटकांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. यासोबतच ठराविक देशांतून आलेल्या नव्हे, तर बाहेरील देशातून येणाऱ्या सर्वांचीच विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : ..म्हणून अरविंद केजरीवालही खेळणार नाहीत होळी