नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा फैलाव काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. काल(शुक्रवार) दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित आढळून आले. अशा कठीण परिस्थितीत दिल्लीतील शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे राशन वाटपाचे काम सोपविण्यात आले आहेत. मात्र, एका शाळेच्या मुख्याध्यापकाने इतरांचा जीव धोक्यात घालून स्वत: मात्र सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दिल्लीतील मोहन गार्डन परिसरातील सरकारी 'बॉईज सीनियर सेकंडरी स्कूल नंबर एक' शाळेतील शिक्षक आणी कर्मचाऱ्यांवर राशन वाटण्याची जबाबदारी आहे. कामावर असताना शाळेतील एका लेखनिकाला कोरोनाची लागण झाली. त्याचा अहवाल मुख्याध्यापकांनी काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना न सांगता फक्त स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले. या माहितीपासून अनभिज्ञ असलेले इतर कर्मचारी मात्र, राशन वाटपाचे काम करतच राहिले.
लेखनिकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी खरे तर इतर शिक्षकांनाही ही माहिती सांगायला पाहिजे होती. मात्र, असे न करता मुख्याध्यापक इंद्राल सिंह घरी क्वारंटाईन राहून इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा घेण्याचे फक्त सांगत राहिले. यामुळे फक्त कामावर असणारे शिक्षकच नाही तर राशन न्यायला येणाऱ्यांचाही जीव धोक्यात आला. जेव्हा ही माहीती शिक्षकांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
राजकीय स्कूल शिक्षक संघाकडून निषेध
9 जूनला लेखनिकाचा कोरोना चाचणी अहवाल आला होता. मात्र, आपला सहकारी कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे इतरांना समजले नाही. जेव्हा ही माहिती राजकीय स्कूल शिक्षक संघापर्यंत पोहचली. त्यांनी मुख्याध्यापकाच्या कृतीचा निषेध केला. जेव्हा मुख्याध्यापकांना लेखनिकाच अहवाल पॉझिटिव्ह आला हे समजल्यानंतर इतरांना तत्काळ याची माहिती द्यायला हवी होती. तसेच शाळा आणि परिसर सॅनिटाईज करून घ्यायला हवा होता. मात्र, त्यांनी असे काहीही केले नाही. शाळा व्यवस्थापन खर्चातून शिक्षकांना मास्क, सॅनिटाईजर आणि इतर सुरक्षेची -उपकरणे मिळायला हवीत, मात्र, ती मिळत नसल्याचा आरोप शिक्षक संघाने केला.
शिक्षिकेचा कोरोनामुळे झाला होता मृत्यू
पूर्व दिल्ली परिसरात राशन वाटपच्या ड्युटीवर असलेल्या एका शिक्षिकेला मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. भजनपुरा परिसरात राशन वाटप करत असताना शिक्षिकेला कोरोनाची बाधा झाली होती. आजारी पडल्यानंतर त्या काही दिवस घरी राहल्या. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना या शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. या सोबतच दिल्लीतील शकारपूर भागातील शाळेत राशन वाटपाच्या कामावर असलेल्या शिक्षकाला कोरोनाची लागण झाली होती.